पितृशोक झालेल्या विलास लांडे यांच्या घरीही भेट
पिंपरी(प्रतिनिधी) – महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन झाले. तर माजी आमदार विलास लांडे यांच्या वडिलांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या स्थानिक नेत्यांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराचा दौरा केला. दोन्ही कुटुंबातील सदस्यांची भेट घेत त्यांनी सांत्वन केले.
शरद पवार आज सकाळी 11 वाजता चिखली, साने वस्ती येथील दिवंगत दत्ता साने यांच्या घऱी पोहचले. तिथे त्यांनी दत्ता साने यांच्या पत्नी, आई, भाऊ व मुलांची भेट घेतली. पवार यांनी त्यांच्या आईशी संवाद साधत त्यांना काळजी घेण्यास सांगितले.
त्यानंतर दुपारी बारा वाजता शरद पवार यांचा ताफा भोसरी, लांडेवाडी येथील माजी आमदार विलास लांडे यांच्या घरी पोहचला. पितृशोक झालेल्या विलास लांडे यांना त्यांनी धीर दिला. तसेच कुटुंबातील सदस्यांची विचारपूस केली. यावेळी पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेविका मंगला कदम व पदाधिकारी उपस्थित होते.