मुंबई – अयोध्येच्या कार्यक्रमासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण पाठवले जाणार आहे. याशिवाय वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि केंद्री मंत्री रामदास आठवले यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले जाणार आहे. राम जन्मभूमी न्यासाने ज्या निमंत्रण पत्रिका कुरिअर केल्या आहेत त्यामध्ये या सर्व नेत्यांची नावे आहेत.
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्री राम जन्मभूमीच्या ठिकाणी प्रतिष्ठापना कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी देशातल्या सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना निमंत्रणे दिली जाणार आहेत. राम जन्मभूमीच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना देण्यात आलं नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावर ठाकरे गटाकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली होती. राज ठाकरेंनीही आपल्याला निमंत्रण आलं नसल्याचं म्हटले होते.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुंबईतून निमंत्रित असलेल्या व्हीव्हीआयपीची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील संत महंत, राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख अध्यक्ष, खेळाडू, चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार, मोठे उद्योगपती काही महत्त्वाचे सेलिब्रिटीज यांना निमंत्रण दिले जाणार आहे.
मी जाणार नाही – पवार
राम मंदिराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आले आहे का आणि आलं तर काय करणार? असा प्रश्न गुरुवारी शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले होते की, राम मंदिराच्या निर्मितीवर मी समाधानी आहे. देव हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो. माझ्याही एक दोन ठिकाणी श्रद्धा आहेत, त्या ठिकाणी मी जात असतो. मला अद्याप अयोध्येचे आमंत्रण आले नाही, आणि आले तर मी जाणार नाही. अशा प्रकारे धर्माच्या आधारे राजकारण करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले होते.