सरकार स्थापन झाल्यावर घोडगंगा कारखाना सुरू करणार – शरद पवार

शिरूर – दिपावली सणानिमित्त माजी आमदार अॅड. अशोक पवार व त्यांचे सहकारी गोविंद बाग, बारामती येथे शरद पवार यांना सदिच्छा व शिरूर-हवेलीतील कार्यकर्त्यांचा तेथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
हे सरकार स्थापन झाल्यावर रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. त्यामुळे शिरुरकरांनो घोडगंगा कारखान्याची कसलीच काळजी करू नका. कारखाना कसा सुरू होत नाही,तेच मी पाहतो, असा ठाम विश्वास शरद पवार यांनी शिरुरकरांना दिला आहे.
माळेगाव (ता. बारामती) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या गोविंद बाग येथील निवासस्थानी महाविकास आघाडीचे शिरूर हवेलीचे उमेदवार व आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून शिरूर हवेलीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, शिरूर तालुक्याचा सर्वोत्तम विकास करण्यासाठी व येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आशिया खंडातील सर्वोत्तम औद्योगिक वसाहत मी शिरूर तालुक्यात आणली.
शेतीला मुबलक पाणी मिळण्यासाठी डिंभे आणि चासकमानचे पाणी शिरुर तालुक्यात आणले. त्यात अशोक पवारांच्या विकासकामांच्या विविध विकासकांमाच्या जोरावर तालुका आज प्रगतीपथात आघाडीवर आहे. सध्या विरोधकांकडे आरोपांसाठी फक्त “घोडगंगा” हेच एकमेव हत्यार आहे. मात्र तुम्ही याची काळजी करू नका. सरकार स्थापन होताच घोडगंगा त्वरित चालू करू, असे आश्वासन शरद पवार यांनी शिरूर हवेलीतील कार्यकर्त्यांना दिले आहे.
यावेळी कृषी आणि पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिरूर तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, हवेलीचे तालुकाध्यक्ष संदीप गोते, सुलभा उबाळे, राजेंद्र सातव, प्रदीप कंद, सतीष कोळपे, सुभाष कोळपे, अतुल बेंद्रे, सोमनाथ बेंद्रे यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





