कळ काढणाऱ्यांना जागा दाखवतो – शरद पवार

उमरगा – आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतून आलो आहोत. आम्ही कधीही कुणाची कळ काढत नाही, पण आमची कळ काढणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहात नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला. पंतप्रधान मोदी मला विचारतात की, संरक्षण खाते तुमच्याकडे असताना तुम्ही काय केले. तुमच्या कार्यकाळात देशावर जेवढे हल्ले झाले तेवढे हल्ले आम्ही होवू दिले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उस्मानाबादचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले, जनतेने निवडून दिल्यानंतर सत्ताधा-यांची त्याचा उपयोग जनकार्यासाठी करायचा असतो. पण ते गेल्या पाच वर्षात तसे झाले नाही. 70 वर्षांत देशात काहीच विकास झाला नाही, असे मोदी सर्व सभांमधून सांगत आहेत. या 70 वर्षांत अटलबिहारी वाजपेयी हेही पंतप्रधान होते. मग अटलबिहारी वाजपेयी यांनीही काम केले नाही, असे मोदींना म्हणायचे आहे का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

गेली अनेक वर्षे पद्मसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात काम केले आहे. हा भाग नेहमीच पाण्यापासून वंचित होता. अशा डॉक्‍टरसाहेबांकडे पाटबंधारे विभागाची जबाबदारी आली आणि आपल्या अधिकाराच्या माध्यमातून पाटील इथल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राणा जगजितसिंह यांनी ती जबाबदारी घेतली. लोकांनी आमदारकीच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यात राणा जगजितसिंह यांना सत्ता दिली आणि या सत्तेचा उपयोग राणा यांनी जिल्ह्याचा विकास गतिमान करण्यासाठी केला असे उदगारही शरद पवार यांनी काढले.

लातूरमध्ये भूकंपावेळी परिस्थिती बिकट होती. मात्र केंद्र सरकार आमच्या पाठिशी उभे होते म्हणून आम्हाला संकटावर मात करता आली. या सगळ्यात शिवराज पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती. लातूरकडून विलासराव मदतीला धावून आले होते. त्यामुळे या भागाला पुन्हा कणखर नेतृत्वाची गरज आहे, असेही शरद पवार म्हणाले.

आताचे पंतप्रधान लष्कराच्या कामगिरीवर स्वतःचा प्रचार करत आहेत. या सरकारला कुलभूषण जाधव यांना अजूनही सोडवता आले नाही. कुठे गेली 56 इंचाची छाती ? असा संतप्त सवालही त्यांनी केला. या जाहीर सभेत उस्मानाबादचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह यांनीही आपले विचार जनसमुदायासमोर मांडले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.