पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांचीही चौकशी झाली पाहिजे – अतुल भातखळकर

मुंबई – पत्राचाळ प्रकरणाच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ते झेपवणारे नाही. बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य होता. ईडीच्या आरोपपत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्वीटही केले आहे.
या प्रकरणात अटकेत असलेले संजय राऊत यांना कालच पुन्हा चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे. दरम्यान, ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात राऊत हेच घोटाळ्याचे मास्टर माईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे.
राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लॉंडरींग केल्याचा आरोपही ईडीने केला आहे. पत्राचाळीच्या पुनविर्कासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्यामध्ये संजय राऊत, म्हाडा अधिकारी व अन्य सहभागी झाले होते, असा उल्लेखही आरोपपत्रात आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपने पवार यांनाही यात घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपचाही पाठिंबा
भातखळकर यांनी पवार यांच्या चौकशीची मागणी केल्याच्या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी विचारले असता ते मंहणाले की भातखळकर अभ्यासू व्यक्ती आहेत. त्यांनी पवार यांच्या संदर्भात जर काही म्हटले असेल तर त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी असणार. त्यामुळे त्यांच्या विनंतीनुसार गृहमंत्री आणि सरकार नक्की काहीतरी कृती करतील असे आपल्याला वाटते.





