Akshay Shinde Encounter : ‘गृह विभागाचा हलगर्जीपणा संशयास्पद’; अक्षय शिंदे एन्काउंटरवर शरद पवारांची प्रतिक्रिया…

Sharad Pawar On Akshay Shinde Encounter : महाराष्ट्रातील बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (23 सप्टेंबर) एन्काऊंटर झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत एका पोलिसालाही गोळी लागली. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षयला पोलिसांकडून गोळी झाडण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यातील विविध स्तरातून या एन्काउंटरवर प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी एसपी पक्षाचे शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडिया एक्सवर शरद पवार म्हणाले, बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे.
बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 23, 2024
बलात्काराची घटना –
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात 13 ऑगस्ट 2024 रोजी एका शाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. शाळेत काम करणाऱ्या सफाई कामगारी अक्षय शिंदेने दोन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला. याबाबत पालकांनी तात्काळ शाळा प्रशासनाला माहिती दिली, मात्र शाळेने याकडे दुर्लक्ष केले. 15 दिवसांपासून सीसीटीव्ही बंद असल्याचे शाळेने सांगितले.
यानंतर पालकांनी मुलीला रुग्णालयात नेले. जिथे तिच्यावर लैंगिक छळ झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे नेण्यात आले, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांना 12.30 तास वाट पाहण्यास लावल्याचा आरोप आहे. यानंतर आरोपी अक्षयला अटक करण्यात आली. या घटनेविरोधात लोक रस्त्यावर उतरले होते.





