शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र, कौतुक करत केली ‘ही’ मागणी

Sharad Pawar Letter to PM Modi : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी हे पत्र लिहिले आहे. यासोबतच, त्यांनी पंतप्रधानांकडे काही मागण्या देखील केल्या आहेत.
गेल्या महिन्यात दिल्लीत 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. त्या निमित्ताने संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेल्या शरद पवारांनी उपस्थित राहिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने आयोजित केलेले साहित्य संमेलन ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरले. आपल्या सखोल आणि चिकित्सक भाषणाने जगभरातील मराठी लोकांच्या मनाला स्पर्श केला. उद्घाटन समारंभादरम्यान आपण माझ्याविषयी दाखवलेली आपुलकी भावणारी होती., असेही ते म्हणाले.
शरत पवारांनी पत्राच्या माध्यमातून तालकटोरा स्टेडियममध्ये मराठा योद्धांचे पुतळे उभारण्याची मागणी केली आहे. त्यांनी पत्रात लिहिले की, ‘मराठा साम्राज्याचे योद्धे पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्या ऐतिहासिक छावणीचा परिसर राहिलेल्या तालकटोरा स्डेडियममध्ये या योद्ध्यांचे अश्वारूढ पुतळे उभारण्यात यावे.’, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.
भारतातील गौरवशाली इतिहासाचे संवर्धन आणि सन्मान करण्याच्या दृष्टीने आपले नेतृत्व नेहमीच महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे या मागणीची दखल घेऊन आवश्यक तो निर्णय होईल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
तालकटोरा स्डेडियमच्या जागेवर पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांनी छावणी उभारली होती. त्यांच्या पराक्रमाने आणि योगदानाने भारतीय इतिहासात अजरामर स्थान मिळवले आहे, असे म्हणत पवारांनी या मराठा योद्धांचे पुतळे उभारावे, अशी मागणी केली.
दरम्यान, साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या सरहद या संस्थेने दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे अर्धाकृती पुतळे बसवण्याचा प्रस्ताव मांडला होता. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवारांनी पत्र लिहित मागणी केली आहे.





