पंढरपूर: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अस विधान त्यांनी केलं आहे. पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या विधानानंतर राजकारण चांगलंच पेटलं आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. त्यांनी राज्याचे नेतृत्त्व केलं पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही, ना कुठला अजेंडा आहे, ना व्हिजन आहे. फक्त छोट्या छोट्या समूह गटांना भडकावून आपल्या बाजूला करणं, त्यांच्यावरच अन्याय करायची अशी त्यांची भूमिका आहे, असा गंभीर आरोप पडळकर यांनी केला आहे. पडळकर म्हणाले, धनगर आरक्षणाबाबत ते पॉझिटिव्ह असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समजाच्या आरक्षणाचं राजकारण करायचं आहे. मागील बजेटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. या सरकारने एक रुपया सुद्धा धनगर आरक्षणासाठी दिला नाही. त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनात यावर बोलावं लागेल. सर्वांना शरद पवारांची भूमिका कळायला लागली आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या वेळी, कोरोनाची परिस्थिती कमी झाल्यानंतर आम्ही धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत याची दखल सरकारने घ्यावी, असे आवाहनही पडळकर यांनी केले आहे.