मविआच्या स्थापनेवेळी शरद पवार म्हणाले होते,”रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करायचं का?”; ठाकरे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्यात महाविकासआघाडी सरकारच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका मोठ्या विधानाबाबत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राहिलेले दिग्गज नेते आहेत. त्यांनी रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करायचं का?” असा सवाल शरद पवारांनी त्यावेळी विचारला होता असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंना गळ घातल्याचेही सांगितले आहे.
अरविंद सावंत यांनी केलेल्या या वक्तव्याने राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.अरविंद सावंत यांनी आपल्या गौप्यस्फोटात “शरद पवार म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?”
“असं असूनही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव दिलं होतं. यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना गळ घातली. हे शिवधनुष्य उद्धव ठाकरेंनाच घ्यावं लागेल असं शरद पवार म्हणाले,” अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली.
दरम्यान, अरविंद सावंत यांनी केलेल्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्याअगोदर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका करत “देशाची वाटचाल अध्यक्षीय हुकूमशाहीकडे होत आहे. सत्ताधारी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करत आहेत, मात्र सर्व भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे आता या पक्षाचे नामांतर ‘भ्रष्ट जनता पार्टी’ असे करण्याची वेळ आली आहे.” असे म्हटले होते.





