सांगली: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. पाटील यांनी उरुण ईश्वरपूर आणि आष्टा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले असून, यामध्ये उरुण ईश्वरपूरसाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी उमेदवारी जाहीर करणारे मलगुंडे हे पहिले उमेदवार ठरले आहेत. शरद पवार गटाच्या उरुण ईश्वरपूर कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आनंदराव मलगुंडे हे जयंत पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ही जागा ओबीसी पुरुष उमेदवारासाठी आरक्षित आहे. मलगुंडे हे धनगर समाजातील असून, त्यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद यशस्वीरीत्या सांभाळले आहे. त्यामुळे आरक्षित जागेवर एका निष्ठावान आणि अनुभवी ओबीसी नेत्याला संधी देऊन पाटील यांनी योग्य राजकीय चाल खेळल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, आष्टा नगरपरिषदेसाठी आष्टा शहर विकास आघाडीकडून विशाल विलासराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उरुण ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात विकास आघाडी किंवा महायुती म्हणून लढण्याची शक्यता असून, विरोधी गटाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. आष्ट्यामध्येही अजित पवार गट आणि भाजप मित्र पक्ष एकत्र येऊन आपला उमेदवार लवकरच घोषित करणार आहेत. मागील काही महिन्यांपासून विरोधकांकडून होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांकडे दुर्लक्ष करत, शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या जयंत पाटील यांनी विरोधकांना थेट प्रत्युत्तर न देता, उमेदवार जाहीर करून आपल्या मुत्सद्दी राजकारणाचे दर्शन घडवले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.