मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून शरद पवार यांच्या पक्षात आलेले ज्येष्ठ नेते सतीश चव्हाण यांनी पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्ष सोडण्याचा रुपाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभा निवडणुकीनंतर पहिला धक्का बसलेला आहे.
सतीश चव्हाण हे मूळचे काँग्रेसी विचारांचे. शरद पवार यांच्या आशीर्वादाने त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. गेल्या तीन दशकांपासून ते राजकारणात आहेत. राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यानंतर सुरुवातीला अजित पवार आणि नंतर तिकीटासाठी शरद पवार यांच्या पक्षात जाणे त्यांनी पसंत केले. परंतु विधानसभेला पराभव होताच पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची वाट धरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
सतीश चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांना रामराम ठोकून गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून निवडणूक लढण्याकरिता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून अजित पवार गटाने त्यांची हकालपट्टी केली होती.
परंतु तिकीटासाठी शरद पवार यांच्या पक्षात आलेल्या सतीष चव्हाण यांना भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी निवडणुकीत पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर निवडणूक निकालानंतर केवळ दोन महिन्यांतच त्यांनी अजित पवार यांच्या पक्षात परतण्याचा निर्णय घेतला आहे. सतीश चव्हाण शनिवारी अजित पवार यांच्या शिर्डीतील मेळाव्यात जाहीर प्रवेश करतील असे सांगितले जात आहे.