Sharad Pawar : महायुतीला लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला का? शरद पवारांनी केले स्पष्ट
कराड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा भरघोस यश मिळालं आहे. महायुतीला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं असताना महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवानंतर आता शरद पवारांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
काय म्हणाले शरद पवार?
“आमची जी अपेक्षा होती तसा निर्णय नाही. शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे, त्यामुळे मी माझ्याकडे काही अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आतापर्यंतची जी व्यवस्था आहे, त्यावर भाष्य करत नाही. निर्णय लोकांनी दिला. अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात आहे. असा निर्णय कधी आला नव्हता. आता आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं शोधणं, नक्की काय आहे समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहणं लोकांमध्ये जाऊन उभं राहणं असे शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांना निवृत्तीबद्दल विचारलं असता मी काय करावं हे मी आणि माझे सहकारी ठरवतील. मुद्दा तो नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजेनेबद्दल काय म्हणाले शरद पवार?
“जी माहिती आम्ही लोकांकडून कार्यकर्त्यांकडून घेत आहे, लाडक्या बहिणीचा मुद्दा लोकांकडून ऐकायला मिळतो. हे एक महत्त्वाचं कारण आहे. प्रत्यक्ष महिलांच्या खिशात काही रक्कम देण्यात आली. त्याचा प्रचार हाही करण्यात आला, दोन अडीच महिन्याची रक्कम आता देत आहोत. त्यांनी सांगितलं की, आम्ही सत्तेत नसलो तर ते बंद होतो. हे बंद होईल याची चिंता महिलांना झाली. त्यामुळे या महिलाांनी आमच्या विरोधात मतदान केलं असे शरद पवार म्हणाले.
ईव्हीएमबाबत काय म्हणाले ?
“दोन एक टक्क्यांनी महिलांचं मतदान वाढलं हे आताच्या आकडेवारी दिसून येतं. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची भूमिका जनतेने घेतली. त्यात थोडसं आम्हाला लोकांचा अधिक विश्वास होता. त्या अधिक विश्वासामुळे जेवढं आक्रमक रितीने या कँपेन करण्याचा प्रयत्न केला. त्यापेक्षा अधिक आक्रमक प्रचार करण्याची गरज होती असे शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडीबद्दल काय म्हणाले ?
मी राज्यात सर्व जिल्ह्यात फिरलो. तिथे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचाही उमेदवार होता. आमचा उमेदवार होता तिथे इतर पक्षाचे कार्यकर्ते राबत होते. सर्वांनी कष्ट केले. पण निकाल आमच्या विरोधात गेला”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.





