Rohini Khadse : रोहिणी खडसे यांनी वडिलांवर केलेल्या टिकेवरून चित्रा वाघ यांना सुनावलं; म्हणाल्या…

जळगाव : भाजप नेत्या, आमदार चित्रा वाघ यांच्यावर सभागृहातील भाषणावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. शरद पवार गटाच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनीदेखील चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर ‘बिग बॉस’ रिएलिटी शो चा संदर्भ देऊन टीका केली. “एका वरिष्ठ सभागृहामध्ये एक महिला एका लोकप्रतिनिधी बाबत असं वक्तव्य करते. त्या सभागृहाची एक गरिमा आहे. त्या गरिमेच्या हिशोबाने तिथे वक्तव्य करणं अपेक्षित आहे” असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
तसेच “कुठेतरी बिग बॉसमध्ये जसं एकमेकांच्या बाबतीत उणी-दुणी काढणार, एकमेकांना गलिच्छ प्रकारे बोलणार, त्यावेळी टीआरपी वाढतो. टीआरपी वाढला की बिगबॉस खुश होतो. इथे असच आहे का? कुठल्यातरी बिग बॉसला खुश करण्यासाठी उणी-दुणी काढायची. एकमेकाच्या अंगावर धावून जायच म्हणजे बिग बॉस खुश होणार. कालचा प्रकार असाच वाटला, यातून निष्पन्न काही झालं नाही. शेतकऱ्यांना काही मिळालं नाही. महिला अत्याचाराबद्दल काही बोलल गेलं नाही. फक्त उणीदुणी काढण्याचा प्रकार होता” अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली.
चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर
“रोहिणी खडसेंना बिग बॉस सारख वाटलं का?. त्यांचे वडिल माझ्यासमोर बसतात. ते जास्त चांगल सांगतील काय आहे ते, त्यांना विचाराव ते चांगलं सांगतील” असे प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी रोहिणी खडसेंना दिले.
माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची तरी माहिती घ्यावी ! ते कोण आहेत, भाजप या पक्षासाठी त्यांचं योगदान काय… याची माहिती कृपा करून तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून जाणून घ्यावी आणि मग बोलावं…
तुम्ही ज्या पक्षाकडून विधान परिषदेच्या…
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 22, 2025
रोहिणी खडसेंचा पलटवार
चित्रा वाघ यांनी वडिलांवर केलेल्या टीकेला रोहिणी खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसे कोण आहेत, तुम्ही ज्या भारतीय जनता पक्षात आहात, त्यासाठी त्यांचे योगदान किती आहे, काय आहे याची कृपा करून माहिती तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून जाणून घ्यावी आणि मग बोलावे. तसेच तुम्ही ज्या पक्षाकडून विधान परिषदेच्या सदस्या झाला आहात, त्या पक्षाला शून्यातून एका वटवृक्षात रुपांतर करण्यात, वाढविण्यात ज्या ठराविक लोकांची नावे घेतली जातात, त्यात माझ्या वडिलांचे नाव अग्रक्रमाने येते.
चार पक्ष फिरून येऊन तुम्ही आरामात ज्या पक्षाच्या विधान परिषदेची जागा मिळवलीय ना आणि भाजपसारख्या भल्या मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत आरामात बसलात ना, त्यात माझ्या वडिलांचे कष्ट आहेत. विचारा तुमच्या वरिष्ठांना… शेतकरी, दुर्लक्षित घटक, ओबीसी बांधव आणि शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करत ते इथवर आलेले आहेत आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रवास आजतागायत सुरूच आहे. यात कधी त्यांनी आकांडतांडव करून प्रसिद्धी मिळवली नाही! त्यामुळे आपण कुणाबाबत बोलतो हे लक्षात घेऊन बोला… उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला नको…. अशा शब्दांमध्ये रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांना सुनावलं आहे.





