महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. हा निर्णय त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. पत्रकार परिषदेत सलील देशमुख म्हणाले,“गेल्या सहा महिन्यांपासून माझी प्रकृती पूर्णपणे बरी नाही. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मी काही कालावधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा राजीनामा देत आहे. प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यानंतर पुन्हा जोमाने लोकसेवेत उतरेन.”तसेच “माझी प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून चांगली नाही. आता काही महिने पूर्ण विश्रांती घेऊन प्रकृती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय होईन. हा राजीनामा केवळ आणि केवळ आरोग्याच्या कारणास्तव आहे. दुसऱ्या कोणत्या पक्षात जाण्याचा विचार सध्या तरी नाही.” शरद पवार आणि राष्ट्रवादीबद्दल काय म्हणाले? “शरद पवार साहेबांनी माझ्या कुटुंबाला खूप काही दिले आहे. पक्षात आम्हाला प्रचंड मान-सन्मान मिळाला. मी जेव्हा पक्षात होतो तेव्हा प्रामाणिकपणे लोकसेवा केली. जनसंपर्क वाढवला आणि मतदारसंघात मोठी विकासकामे आणली. यापुढेही लोकांमध्ये राहून त्यांच्या सेवेत राहीन.” सलील देशमुख यांनी कोणत्याही नेत्यावर किंवा पक्षातील कोणत्याही गटावर नाराजी असल्याचे संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा हा राजीनामा खरोखरच केवळ आरोग्याच्या कारणास्तव आहे की यामागे दुसरे काही राजकीय गणित आहे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल, अशी चर्चा नागपूर आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या राजीनाम्यामुळे नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. कारण सलील देशमुख हे पक्षाचे तरुण आणि सक्रिय चेहरे होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.