Sharad Pawar : शरद पवारांना परभणीत मोठा धक्का! ‘हा’ माजी आमदार सोडणार साथ

परभणी : शरद पवार यांना परभणीत मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील परभणीतील नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख देखील ठरली आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी आज कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.
एकीकडे शरद पवार आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तर दुसरीकडे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. पुढील काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बाबाजानी दुर्राणी यांचा अजित पवार गटात होणारा प्रवेश शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
बाबाजानी दुर्राणी यांनी आज पाथरीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी पक्षांतराचा निर्णय जाहीर केला असून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या ८ जून रोजी बाबाजानी दुर्राणी हे पाथरीत अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह अधिकृतपणे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडणार आहे.





