विधानसभेसाठी शरद पवारांनी जाहीर केला पहिला उमेदवार

सांगली : लोकसभेच्या निकालानंतर आता शरद पवारांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला आहे. यादरम्यान शरद पवार यांनी विधानसभेसाठी महाराष्ट्रातून पहिला उमेदवार जाहीर केला आहे. स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आगामी काळात साथ देण्याचं आवाहन त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळकरांना केले आहे.
शरद पवार हे आज सांगली दौऱ्यावर होते यादरम्यान त्यांनी ही घोषणा केली.आमदार सुमनताई यांच्यानंतर आता रोहित पाटील यांच्या पाठीशी राहा, येणाऱ्या काळात तुम्ही रोहितला ताकद द्या, आम्ही सर्व प्रश्न सोडवू असं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे.
रोहित पाटील यांनी नुकताच त्यांचा 25 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर ते आता तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. त्यानंतर आता शरद पवारांनी त्यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तासगावमधून सुमनताई पाटील या सध्या आमदार असून त्या आधी स्व. आर आर पाटील हे या मतदारसंघाचं नेतृत्व करायचे.





