Sharad Pawar | Ajit Pawar । Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारचा शपथविधी 25 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडिअम किंवा राजभवनात शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट, अजितदादा गट आणि भाजपचे आमदार मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पार्टीने 132 जागा जिंकल्या असून शिंदेंच्या शिवसेनेनं 57 जागांवर बाजी मारली आहे. महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे. सध्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अश्यातच आता अजित पवारांच्या जवळच्या नेत्याने एक मोठे विधान केले आहे. ‘ दादांना एकदा मुख्यमंत्रीपद द्यावं, अशी माझी इच्छा आहे.!’ असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. आज समाज माध्यमांशी बोलताना नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्रिपदावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही माझी इच्छा किंवा अपेक्षा म्हणण्यापेक्षा जनतेचीही इच्छा आहे. परंतू शेवटी हे महायुतीचे नेते आहेत. त्यात मग पंतप्रधान मोदी, अमित शाह हे बसून जो काही निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य करावा लागेल. पण माझी विनंती आहे की, दादांना एकदा मुख्यमंत्रीपद द्यावं, अशी माझी इच्छा आहे”, असे नरहरी झिरवाळ म्हणाले. मलाही कोणतंही एखादं मंत्रीपद द्यावं ! “मी दररोज मंत्रालयात जात असतो. त्यामुळे आता मलाही कोणतंही एखादं मंत्रीपद दिलं तरी चालेल, पण द्यावं ही विनंती. शरद पवार अजित पवार कधीही एकत्र येऊ शकतात. राजकारणात काहीही होऊ शकतं. राजकारणात कोण कोणाचा शत्रू मित्र या गोष्टी सुरुच असतात”, असेही नरहरी झिरवाळ यांनी म्हटले.