मुंबई – अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली आहे. हे काकाच्या मृत्यूची वाट बघतायेत. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता, जनता तुम्हाला तुमची औकात नक्कीच दाखवेल, असा घणाघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केला आहे.
शेवटची निवडणूक आहे, असे सांगून तुम्हाला भावनिकही केले जाईल. मात्र कधी शेवटची निवडणूक होईल काय माहिती? असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला व बारामतीकरांना साद घालत मी जो उमेदवार देईल त्याला निवडून द्या, असे विधान केले. अजित पवारांच्या या विधानावर आव्हाड संतापले. त्यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली.
आव्हाड म्हणाले, एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करण कितपत योग्य आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतोय. शरद पवार अजरामर राहतील, त्यांचे योगदान अजरामर राहील. आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग हे देखील नावे काढतात. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसले जाईल याची आज तुम्ही वाट बघता असले घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी बघितले नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
शरद पवार यांचे प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे आहेत. तुमचा एक निर्णय दाखवा. अजित पवार यांनी त्यांचे दिल्लीतल एक भाषण दाखवावे. साहेबांची खरी चूक आहे साहेबांनी अजित पवारला कधी ओळखले नाही. राज्य उत्पादन मागितले ते दिल. शेवटच्या निवडणुकीची वेळ तुमच्यावर पण येणार आहे. शरद पवार यांच्या मृत्यूची वाट बघणारा कलंकित अजित पवार महाराष्ट्राला आणि बारामतीकरांना कधीच आवडणार नाही, असे देखील आव्हाड म्हणाले.
भुजबळ ओबीसींना फसवत आहेत
छगण भुजबळ दोन समाजामध्ये का वाद निर्माण करताय? महाराष्ट्राची लाज काढताय, महाराष्ट्र जाळायचा आहे का पूर्णपणे? तुम्ही गरीब ओबीसी समाजाला फसवत आहात. भुजबळ खोटं बोलतात राजीनामा दिला ना मग सुविधा कसल्या घेता, अशी टिका देखील त्यांनी केली.