मुंबई: राजकीय मतभेद बाजूला ठेवून नेतेमंडळी खासगी समारंभात एकत्र येत असल्याचे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. नुकताच एका लग्न समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती गौतम अदानी हे एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्याचे दिसून आले. या तिन्ही दिग्गजांचा एकत्र असलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीच्या लग्नात दिगज्जांची उपस्थिती – हा शाही विवाह सोहळा सातारा येथील आयपीएस अधिकारी प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता आणि हिमांशू यांच्या लग्नाचा होता. या समारंभास उपस्थित राहिल्याची माहिती खुद्द शरद पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. पवारांनी पोस्टमध्ये लिहिले, “आयपीएस अधिकारी प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता व हिमांशू यांच्या लग्न समारंभास उपस्थित राहिलो; नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते.” व्हायरल फोटोतील आसन व्यवस्था चर्चेचा विषय – व्हायरल झालेल्या फोटोमध्ये, एका सोफ्यावर शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी शेजारी बसलेले दिसत आहेत. तर, त्यांच्या बाजूलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे खुर्चीवर बसलेले आहेत. या फोटोमधील आसन व्यवस्थेमुळे नेटकऱ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. विशेषतः, शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये गौतम अदानी यांचा उल्लेख टाळल्याबद्दल अनेकांनी कमेंट्स करत सवाल विचारले आहेत. दिग्गजांना जोडणारे शरद पवारांचे राजकारण – शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, हे वारंवार दिसून आले आहे. राजकीय विरोधक असूनही, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले होते. तसेच, उद्योगपती गौतम अदानी यांच्याशीही पवारांची जवळीक आहे. पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातही अदानींचा उल्लेख आढळतो आणि अदानी यांनी बारामतीलाही भेट दिली होती. या लग्नसोहळ्यातील फोटोमुळे, राजकीय विरोधासोबतच खासगी पातळीवर संबंध जपणाऱ्या शरद पवारांच्या राजकारणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे राजकारण नेहमीच विविध क्षेत्रांतील दिग्गजांना जोडण्याचे राहिलेले आहे, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.