Sharad Pawar: आजारपणानंतर शरद पवारांचं दमदार कमबॅक; रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड
Sharad Pawar: दरम्यान, काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहिल्यानंतर साताऱ्यातील या कार्यक्रमातून शरद पवार यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले.

Sharad Pawar: प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र साताऱ्यात पाहायला मिळाले.
रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत त्यांची 2026 ते 2029 या कालावधीसाठी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने संस्थेवरील त्यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले.
निवडीनंतर बोलताना पवार यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त केली. “आपण कुठे कमी पडलो आणि आणखी काय नवीन करता येईल, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले.
कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी उभा केलेला शिक्षणाचा आदर्श पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याची आवश्यकता अधोरेखित करताना त्यांनी AI चा विशेष उल्लेख केला. ग्रामीण भागातील विद्यार्थीही आता AI विषयी बोलत असल्याचे समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देतानाच हितचिंतकांकडून संस्थेला मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहिल्यानंतर साताऱ्यातील या कार्यक्रमातून शरद पवार यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले.





