Pune District : शेत पाणंद रस्ते योजनेच्या विधानसभा क्षेत्रीय समितीवर शांताराम भोसले
Pune District : या नियुक्तीसाठी महसूलमंत्र्यांना अधिकार देण्यात आले होते.

राजगुरुनगर : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठित करण्यात आलेल्या विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीवर १९७ – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे खेड तालुका अध्यक्ष शांताराम भोसले यांची सह-अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महसूल व वन विभागाने १५ जुलै रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीत अधिक सुसूत्रता व समन्वय साधण्यासाठी विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये सह-अध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियुक्तीसाठी महसूलमंत्र्यांना अधिकार देण्यात आले होते.
या शासन निर्णयानुसार संबंधित विधानसभा क्षेत्रातील समितीवर सह-अध्यक्ष म्हणून प्रतिनिधींचा समावेश करण्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर शांताराम भोसले यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना गती मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांच्या विकासासाठी समन्वय वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीवर सह-अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्री तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे मी आभार मानतो. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत दर्जेदार पाणंद रस्ते उपलब्ध व्हावेत, रखडलेली कामे मार्गी लागावीत आणि या योजनेची प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून प्रामाणिकपणे काम करणार आहे.
– शांताराम भोसले, खेड तालुका अध्यक्ष, भाजप.





