विविधा: शांता शेळके

माधव विद्वांस

प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री शांता शेळके यांची आज जयंती. त्यांचा जन्म 12 ऑक्‍टोबर 1922 रोजी पुणे-सोलापूर मार्गावरील इंदापूर सारख्या ग्रामीण भागात झाला. ग्रामीण भागात जन्मलेल्या या विदुषीने संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळविले, तसेच माझी साहित्यसंपदा संस्कृतमुळेच बहरली असे त्या आवर्जून सांगत. त्या कवयित्री, लेखिका, अनुवादक, बालसाहित्य लेखिका आणि पत्रकार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा व स. प. महाविद्यालयात झाले. एम.ए.साठी मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले. भक्‍तिगीत, भावगीत, लावणी, प्रेमगीत, निसर्ग, बालगीत अशा अनेक प्रकारातून त्यांची काव्यसंपदा बहरली होती.

त्यांनी 70 ते 75 चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपणनावाने देखील गीते लिहिली.त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. आचार्य अत्र्यांचे नवयुगमध्ये 5 वर्षे पत्रकारिता केली. त्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापक म्हणून काम केले. त्या कवितेचे सुंदर रसग्रहण करीत. आमच्या शालेय जीवनात 11वीसाठी त्यांनी लिहिलेली मार्गदर्शिका (गाईड) अभ्यासासाठी आम्ही वाचत असू.

“वर्षा’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह (1947). रुपसी, तोच चंद्रमा, गोंदण, जन्मजान्हवी, पूर्वसंध्या, इत्यर्थ इ. काव्यसंग्रह व गीतसंग्रह प्रसिद्घ झाले. त्यांनी विपुल बालकथा, बालगीतेही लिहिली (थुई थुई नाच मोरा, टिप्‌ टिप्‌ चांदणी, झोपेचा गाव). मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठीही त्यांनी गीतलेखन केले आहे. संतांचे अभंग व ओव्या तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचा त्यांच्या रचनांवर प्रभाव होता. सुरुवातीस माधव ज्युलियन यांच्या काव्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता.

1996 मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. ह्यांखेरीज फाय फाउंडेशन, मंगेशकर प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण, गदिमा, सु. ल. गद्रे इ. अनेक पुरस्कार व मानसन्मान त्यांना लाभले. त्यांच्या चिमणचारा, कविता करणारा कावळा, गोंदण इ. ग्रंथांसही महाराष्ट्र शासनाचे वाङ्‌मयीन पुरस्कार मिळाले. अनुवादक म्हणून शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. त्यांनी अनेक वर्षे नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले. “रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ सारख्या लावणी लिहिणाऱ्या शांताबाई या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार होत. 6 जून 2002 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. आठवणींना अभिवादन.

Leave A Reply

Your email address will not be published.