Jitendra Awhad : शांत…. सरकार झोपले आहे: जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका, उपस्थित केले ५ प्रश्न; म्हणाले.. मुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांसाठी..

पुणेः स्वारगेट बस डेपोत बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच या धक्कादायक घटनेनंतर बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. राज्यभरातून या धक्कादायक घटनेप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. या प्रकरणावर शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आव्हाड यांनी यासंबंधी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून प्रतिक्रिया दिली आहे. शांत……… सरकार झोपले आहे, अशी टीका आव्हाडांनी सरकावर या प्रकरणावरून केली आहे.
राज्यातील पोलीस प्रशासनाची संवेदनशीलता आणि महिलांची सुरक्षितता रसातळाला गेल्याची परिस्थिती आहे. स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेला कित्येक तास उलटून गेले तरी आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याउलट पोलीस प्रशासन पीडित तरुणीलाच दोष देण्याचं काम करत आहे, असे घडलेल्या प्रसंगानंतर तरुणीची मानसिक स्थिती काय असेल याची एकुलत्या एका मुलीचा बाप म्हणून कल्पनाही करवत नाही.
झाला प्रकार या तरुणीला लगेच कुणाला तरी सांगावा वाटला नाही. यात आपल्या सर्वांचा समाज म्हणून मोठा पराभव आहे. सार्वजनिक ठिकाणी सुद्धा महिला असुरक्षित आहेत आणि या प्रसंगाच्या निमित्ताने महिला सुरक्षेचे अनेक प्रश्न उभे राहतात, अशी पोस्ट आव्हाड यांनी लिहित या घटनेविषयी ५ प्रश्न उपस्थित केले आहेत.
आव्हाडांनी उपस्थित केलेले ५ प्रश्न
स्वारगेटचे नेहमीचे प्रवासी सांगतात की, स्वारगेट बस स्थानकात रात्री पुरेसा प्रकाश नसतो. बस गाड्या नियोजित फलाटावर लागत नाहीत. आगार व्यवस्थापक चौकशीसाठी येणाऱ्या प्रवाशांना व्यवस्थित माहिती देत नाहीत. रात्री मुक्कामी असणारी बस लॉक का नव्हती? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. घटनास्थळापासून स्वारगेट पोलीस स्टेशन अवघ्या हाकेच्या अंतरावर असूनही तिथे पोलीस रात्रभर गस्त का घालू शकत नाहीत, असा सवाल त्यांनी पोलिसांना विचारला आहे.
शांत……… सरकार झोपले आहे
राज्यातील पोलीस प्रशासनाची संवेदनशीलता आणि महिलांची सुरक्षितता रसातळाला गेल्याची परिस्थिती आहे. स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेला कित्येक तास उलटून गेले तरी आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याउलट पोलीस प्रशासन पीडित…— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 26, 2025
मुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांसाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट
मुळात एखादा गुन्हा घडल्यानंतर पीडित व्यक्तीला पोलिसांकडे जाण्याची भीती वाटत असेल, तर पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत ही एक अफवाच उरते. मुख्यमंत्री असलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या दोघांसाठीही ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, असल्याचे ते म्हणाले आहेत.
पोलिसांकरवी थातूर-मातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेण्यापेक्षा पोलीस खात्यातील आणि राज्य परिवहन महामंडळातील संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच पीडित तरुणीला लवकरात लवकर न्याय देण्यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी आव्हाडांनी सरकारडे केली आहे.





