Shankar Mandekar – विकासकामांसाठी सतत झटणारे, सातत्याने लोकांची कामे करणारे, कामाचा माणूस आपले दादा आपल्यातून गेल्याचे दु:ख आहे. दादांचे विचार आणि वर्तणूक आदर्श देणारी असून, त्यांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी घेऊन भोर-राजगड-मुळशीच्या विकासासाठी दादांनी जे शब्द दिले असतील ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व कटीबध्द आहोत, असा भावना भोर-राजगड-मुळशी विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर यांनी व्यक्त केल्या.दिवंगत उपमुखमंत्री अजित पवार यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी मुळशी तालुक्यातील सर्वपक्षीयांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार अशोक मोहोळ उपस्थित होते. माजी आमदार शरद ढमाले, ज्येष्ठ नेते रामभाऊ ठोंबरे, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले, माजी सभापती रवींद्र कंधारे, जिल्हा बॅंकेचे सुनील चांदेरे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता दगडे, सारिका मांडेकर, राष्ट्रवादी काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष अकुंश मोरे, कालिदास गोपलघरे, प्रकाश भेगडे, अजित पवार आबासाहेब शेळके, मिलिंद वाळंज, सागर साखरे, अनिल पवार, प्रवीण धनवे, रमेश पवळे, नाना शिंदे, श्रीकांत कदम यासह सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.वेळेला महत्व देणारे नेते अशी ओळख असलेले अजित पवार यांनी विकास हाच एकमेव ध्यास घेऊन मुळशीसह पुणे जिल्हा आणि राज्यात विकास कामांचा डोंगर उभा केला. सर्वसामान्याच्या समस्या-अडचणी समजून घेऊन त्या तात्काळ सोडविणारा नेता म्हणजे अजितदादा.. त्यांच्यासारखा वेळ पाळणारा आणि काम करणारा नेता महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही, अशी भावना व्यक्त करताना अशोक मोहोळ यांना अश्रू अनावर झाले. यावेळी उपस्थितांनी दादांच्या आठवणींना उजाळा देताना अश्रू आणि हुंदक्यांनी सभागृह गहिवरून गेले. “दादांनी तळागाळापर्यंतच्या प्रत्येक घटकाला न्याय दिला. ते आपल्यातून निघून गेले असले तरी कामांच्या रूपाने त्यांच्या स्मृती आपल्यात आहेत. त्यांची विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एकदिलाने काम करू आणि पुण्याभोवतालच्या रिंगरोडला अजित पवार यांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करू.” – शंकर मांडेकर, आमदार, भोर-राजगड-मुळशी विधानसभा