शेन वॉटसनचा आयपीएलला रामराम

चेन्नई – अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतून चेन्नई सुपर किंग्जच्या शेन वॉटसन याच्या रूपाने पहिली निवृत्ती जाहीर झाली आहे. आजवर या स्पर्धेने मला जे काही दिले त्याचा आजन्म ऋणी राहिन, थांबण्याची हीच योग्य वेळ आहे, अशा शब्दात चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू व ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू शेन वॉटसन याने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केल्यानंतर चेन्नईची युएई वारी संपुष्टात आली. या स्पर्धेत त्यांना स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच प्ले-ऑफमध्येही स्थान मिळवता आले नाही. आता वयाची चाळिशी गाठल्यानंतर मला थांबावे असे वाटू लागले व निवृत्तीची हीच वेळ योग्य असल्याचे जाणवले, असेही त्याने सांगितले.
या सामन्यानंतर वॉटसनने चेन्नई संघाच्या ड्रेसिंगरुममध्येच आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. चेन्नई संघासह खेळणे माझ्यासाठी खूप भावनिक बाब होती. आता पुढील काळात कायमच मला त्याची आठवण होत राहील, असेही त्याने सांगितले.
39 वर्षीय वॉटसनने आयपीएलमध्ये 145 सामने खेळले असून त्यापैकी 43 सामने चेन्नईसाठी खेळले आहेत. यंदाच्या स्पर्धेतही त्याने काही सामन्यात चांगली खेळी केली आहे. त्यातील किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध नाबाद 83 धावा केल्या होत्या. धोनीबरोबरच्या मैत्रीचाही त्याने आवर्जुन उल्लेख केला व त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या.





