शंभूराजेंनी आजोबांच्या नावाला काळिमा फासला

मल्हारपेठ – शंभूराज देसाईंच्या आजोबांनी कायम स्वत:चा स्वाभिमान अबाधीत ठेवला. परंतु, शिवसेनेशी गद्दारी करून अजन्म पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या आजोबांच्या नावाला काळिमा फासण्याचे काम शंभूराज देसाई यांनी केले, असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी केला.
मल्हारपेठ ता. पाटण येथील महाप्रबोधन यात्रेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, सचिन मोहिते, संजय भोसले, विश्वनाथ दरावडे, जिल्हा संघटक गजानन कदम, रविंद्र पाटील, अनिताताई जाधव, छायाताई शिंदे, सुरेश पाटील आदी. मान्यवर उपस्थित होते.
उपनेत्या अंधारे म्हणाल्या, तुम्ही तुमच्या आजोबांच्या विचारांचे तरी झालात का? असा सवाल उपस्थित करीत ज्यांच्यामुळे आजपर्यंत सहकार परिषदेचे अध्यक्षपद, मंत्रीपडे आणि तीन वेळा आमदारकी भोगली; त्या ठाकरे कुटुंबाबद्दल बोलणे तुम्हाला शोभत नाही. त्यामुळे आज “प्रॉमिस डे’ दिवशी सांगते, ठाकरे कुटुंबातील सदस्याबरोबर सोडाच; पण, पाटण तालुक्यातील एखाद्या निष्ठावंत शिवसैनिकाबरोबर जरी तुम्ही लढलात, तरी येत्या निवडणुकीत तुमच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी ना. शंभूराज देसाई यांना दिला.
त्या म्हणाल्या, एकनाथ व शंभूराज भाऊ कारकुनीचे काम करत आहेत. हुकुमाचा दावेदार कोण आहे, तुम्हाला माहित आहे. त्या लोकांनी 50 खोके घेवून आज बोके माजले आहेत. चावी दिलेल्या खेळण्याप्रमाणे भाजप तुम्हाला पळवत आहे. आज दारु दुकाने बंद करणे आवश्यक आहे. पण, नाक्या-नाक्यावर दुकाने सुरू करून अनेक माताभगिनींचे संसार उद्धवस्थ करत आहात. धमक असेल; तर दारुची दुकाने बंद करा. 32 वर्षाच्या पोरानं 40 जणांच्या बत्तीशी बंद करून कुलूपे लावली आहेत. आदित्य ठाकरे आजोबांच्या विचारांना जागते ठेवून शिवसेनेचा वटवृक्ष करत आहेत. त्याची राखण करत आहेत. परंतु, तुम्ही तुमच्या आजोबांच्या विचारांना काळिमा फासण्याचे काम केले असून ते सूड भावनेने काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सत्तेचा एवढा दर्प बाळगणे बरे नव्हे..
मी सत्तेसाठी पक्षात आले नाही. तर पडत्या काळात एक निष्ठावंत, इमानदार लढवयाच्या यादीत माझे नाव आले, तरी मी धन्यता मानेन. पण, तुमचे नाव कोणत्या यादीत असेल, ते ठरवून आत्मपरिक्षण करा. असत्यावर सत्याचा विजय कायम होत असतो. संख्या कमी असली, तरी पाच पांडव तुम्हाला पुरेसे आहेत. सत्तेचा एवढा दर्प बाळगणे बरे नव्हे, असा टोमणाही त्यांनी यावेळी लगावला.
तुमच्या सत्तेचा आलेख शिवसेनेमुळेच…
शिंदे सरकारामध्ये निवडणुका घेण्याची धमक नाही. पाटण तालुका वेगळा नसून केंद्रबिंदूच्या जवळचाच आहे. शंभूराज देसाई यांना ठाकरे घराण्यावर बोलण्याचा अधिकार आहे का? खुल्या व्यासपीठावर येऊन पक्षाची भुमिका व काम सांगा. तुमचा राजकीय सत्तेचा आलेख फक्त शिवसेनेमुळेच आहे. शिवसेना वाढविण्यासाठी तुम्ही कोणती गोष्ट केली? आम्ही ठाकरे कुटुंबाशी प्रमाणिक आहे. तुम्ही प्रत्येक पत्रकार परिषदेत टिका करताय. ते तुम्हाला शोभतयं का? असा सवाल हर्षद कदम यांनी उपस्थित केला.





