पुणे (संजय कडू) -शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने त्याच्यापुढे पोटपाण्याचा प्रश्न उभा ठाकलाय. परिणामी या विवंचेने ग्रासलेला शेतकरी आता दोन पैशासाठी अफू पिकवू लागलाय. पण तिथेही त्याला “चोर’ ठरवून त्याला तुरुंगाची हवा खावी लागतेय. या प्रकरणातून शेतकऱ्यांनी एक तर आमच्या पिकाला भाव द्या, नाहीतर आम्हाला पैसे मिळवून देणारी अफू पिकवू द्या, अशी प्रतिक्रिया शेतकरी देऊ लागले आहेत. आम्ही जगावं की, मरावं असा काळीज पिळवटून टाकणारा प्रश्नही ते उपस्थित करताहेत. पुणे जिल्ह्यात शेतकरी नफ्यासाठी पिकात छुप्या पद्धतीने गांजा किंवा अफू पिकवू लागले आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी मागील दोन महिन्यांत तब्बल चार छापे टाकून अफूची शेती उद्ध्वस्त केली आहे. तर शहर पोलिसांनीही नुकताच शेतावर छापा टाकून लाखो रुपयांचे छुपे गांजाचे पीक जप्त केले. शेतमालाला योग्य तो भाव मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांनी हा चुकीचा मार्ग निवडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीुूसार, पुणे-सासवड रस्त्यावरील वडकीजवळील होळकरवाडी येथे असलेल्या अफूच्या शेतीवर पुणे शहर पोलिसांनी गुरुवारी छापा टाकून अफुची रोपे जप्त केली. तर शुक्रवारी दुपारी ग्रामीण पोलिसांनी इंदापूर येथील तीन एकर क्षेत्रात पसरलेल्या शेतावर छापा टाकला, त्या ठिकाणी गांजाची मोठी लागवड आढळून आली. पुणे ग्रामीण पोलिसांनी 2023 मध्ये खेड, जेजुरी, सासवड आणि इंदापूर येथील शेतजमिनींवर छापे टाकले आहेत. मागील वर्षी ग्रामीण पोलिसांनी इंदापूर, शिक्रापूर, ओतूर, सासवड, मंचर येथे पाच छापे टाकले होते. हे सर्व शेतकरी गांजा किंवा अफूच्या बेकायदेशीर शेतीमध्ये गुंतलेले होते. त्यांनी परवान्याशिवाय या वनस्पतींची लागवड केली होती. ही शेती केवळ नफ्यासाठीच केली जात असल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले. तर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा तपास करणारे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी सांगितले, आम्ही दोन शेतकऱ्यांना गांजा पिकवल्याबद्दल अटक केली. राज्यात खसखस पिकवण्यास बंदी आहे. याचे उत्पादन ठराविक राज्यातच अधिकृतपणे केले जाते. प्राथमिक तपासात दारु व्यवसायाशी निगडीत अनेक लोक शेतकऱ्यांना अफू पिकवण्यासाठी मोफत बिया देऊन जातात. तसेच पीक तयार झाल्यावर त्याची तोडणी करुन घेऊन जातात. यावर आडबाजूला असलेल्या शेडमध्ये प्रक्रिया केली जाते.शेतकऱ्यांना हे पीक घेण्यासाठी मोठा मोबदला दिला जातो. नंतर गांजा, अफू शहरात छुप्या पद्धतीने विकला जातो. पोलीस म्हणतात… आम्ही गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची चौकशी करत आहोत. त्यांनी गांजा पिकवल्यावर पुढची प्रक्रिया कुठे केली जाते? त्याचे खरेदीदार कोण आहेत? बियाणे कोण आणून देते? शेतकरी बियाणे कोठून मिळवतात हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. कोयता गॅंग आणि गांजा शहरात गांजाची मागणी वाढू लागल्याने गांजाची छुपी शेती करण्याकडे काही शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. गांजाची एक पुडी 50 रुपयांना मिळते. अल्पवयीन मुले त्याच्या आहारी गेली आहेत. शहरात मागील काही दिवसांत कोयता गॅंगने ठिकठिकाणी जो धुमाकुळ घातला, त्यातील बहुतेक जण गांजाच्या नशेच्या आहारी गेलेले आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. गांजामुळे आक्रमकता वाढते, याची नशा केलेला व्यक्ती नियंत्रणाबाहेर जातो. यामुळे गांजाची विक्री रोखल्यास कोयता गॅंगही नियंत्रणात राहू शकते, असे व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांनी सांगितले.