Bangladesh cricket : अष्टपैलू खेळाडू अडकला हत्येच्या गुन्ह्यात, FIR ही दाखल; होऊ शकते अटक…

Shakib Al Hasan : – शाकिब अल हसन हा बांगलादेशचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. त्याने बांगलादेश संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. तो बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर 704 विकेट्स आहेत. ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशात ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या निदर्शनांदरम्यान झालेल्या एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी आता त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. ढाका पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्याची शक्यता आहे.
वास्तविक, बांगलादेशात ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब-अल-हसन यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. शाकिबसह या प्रकरणात एकूण 156 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्या तरुणाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दाखल केलेल्या तक्रारीमध्ये आवामी लीगच्या 154 स्थानिक कार्यकर्त्यांसह शाकिब व माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा देखील समावेश आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशिटनुसार शाकिबला 28 वा आरोपी बनविण्यात आले आहे. पाकिस्तान दौऱ्याच्या तयारीसाठी घेण्यात आलेल्या सराव शिबिराला शाकिब उपस्थित नव्हता.
दरम्यान, बांगलादेशात आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. यानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीन यांनी पदाचा राजीनामा दिला आणि त्या भारतात आल्या. त्यांच्यानंतर मोहम्मद युनूस बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख झाले. तेव्हापासून अवामी लीग पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. बांगलादेशात महिनाभरापूर्वी अवामी लीगचे सरकार होते. स्टार ऑलराऊंडर असण्यासोबतच शाकिब अवामी लीगचा खासदार आहे. आपल्या जन्मगावी मागुरा येथून निवडणूक जिंकून त्याने या वर्षी जानेवारीत संसदेत प्रवेश केला होता. सध्या तो पाकिस्तानातील रावळपिंडी येथे कसोटी सामना खेळत आहे.
बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डातही बदल करण्यात आले आहेत. माजी मुख्य निवडकर्त्याला बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. त्याने नजमुल हसनची जागा घेतली आहे.





