महामानवाच्या जयंतीसाठी शाहूनगरी सज्ज

सातारा – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती उत्सवासाठी शाहूनगरीसह संपूर्ण जिल्हा सज्ज झाला आहे. या निमित्त उद्या, दि. 14 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर भीमाई उत्सव संयोजन समितीच्यावतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
करोनामुळे दोन वर्षे सण व उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र, यंदा महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीपासून (दि. 11) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत (दि. 14) भीमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार पेठेत पाण्याच्या टाकीच्या परिसरात उभारलेल्या सभामंडपात खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भीम फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला साताऱ्यातील शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विद्युत रोषणाईने उजळला होता. जयंतीच्या शुभेच्छा फलकांची गर्दी या परिसरात झाली आहे.
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शाहू चौकात येणाऱ्या भीम ज्योतींचे स्वागत शुक्रवारी (दि. 14) केले जाणार आहे. रिपाइं (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्र नेते अशोक गायकवाड, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष किशोर गालफाडे व पदाधिकारी सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करणार आहेत. भीमाई वंदना, स्फूर्तिगीतांचा जलसा आणि रॅली असे कार्यक्रम होणार आहेत. शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून होणारी पुष्पवृष्टी आकर्षणाचा मुख्य विषय आहे. जिल्हाभरातून साताऱ्यात येणाऱ्या भीमसैनिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व सरबताची सोय करण्यात येणार आहे, असे संयोजन समिती सदस्यांनी सांगितले. साताऱ्याबरोबर वाई, पाचगणी, महाबळेश्वर, वडूज, शिरवळ, कराड येथेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.





