शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटातील दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री, सिनेमात केले ‘हे’ मोठे बदल

Deva Movie: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा ‘देवा’ चित्रपट लवकरच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. मात्र, 31 जानेवारीला रिलीज होण्यापूर्वी हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही दृश्ये काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
सीबीएफसीने या चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र दिले आहे. तसेच, या चित्रपटातील 3 सीन्स बदलण्यास सांगितले आहे. यामुळे आता चित्रपटाचा कालावधी कमी होणार आहे. चित्रपटातील शाहिद कपूर आणि अभिनेत्री पूजा हेगडेचा इंटीमेट सीन हटवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर ही 6 सेकंदांची क्लिप चित्रपटातून हटवण्यात आली आहे.
तसेच, चित्रपटातून अश्लील हावभाव असलेली काही दृश्ये देखील काढून टाकण्यात आली आहेत. काही ठिकाणी शिवीगाळ, आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला होता. ते देखील सीबीएफसीने हटवले असून, त्याजागी दुसऱ्या शब्दांचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, या सीनमधील डायलॉग आणि सबटाइटल्स दोन्ही ठिकाणी बदल करण्यास सांगण्यात आले आहे.
चित्रपटात एका ठिकाणी निर्मात्यांनी मुंबईतील फोर्टचा उल्लेख हुतात्मा चौक असा केला आहे. याबाबतही त्यांना स्पष्टीकरण मागण्यात आले. सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवल्यानंतर आता चित्रपटाचा कालावधी 2 तास 36 मिनिटे झाला आहे.
दरम्यान, 75 कोटी रुपयांचे बजेट असलेला ‘देवा’ हा चित्रपट 31 जानेवारी 2025 ला रिलीज होणार आहे. यामध्ये शाहिद कपूर, पूजा हेगडे, पावेल गुलाटी, कुब्रा सैत या कलाकारांची प्रमुख भूमिका असून, चित्रपटाचे दिग्दर्शन रोशन अँड्रयूज यांनी केलं आहे.





