O ROMEO Teaser : बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर त्याच्या आगामी ‘ओ रोमिओ‘ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये शाहीद कपूरच्या अनोख्या लूकने लक्ष वेधून घेतले आहे. शाहिदच्या खतरनाक लूकमुळे चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता प्रचंड वाढली आहे. हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ या दिवशी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे प्रदर्शन व्हॅलेंटाईनडेच्या पूर्वसंध्येला होणार असल्याने ते खूप खास असणार आहे. हा अॅक्शन-थ्रिलर आणि रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केले आहे. शाहिद कपूरसोबत चित्रपटात तगडी स्टारकास्ट असून, अभिनेत्री तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय विक्रांत मैसी, दिशा पाटनी, तमन्ना भाटिया, अविनाश तिवारी, फरीदा जलाल, दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, रणदीप हुडा, दिशा पटानी आणि फरीदा जलाल या कलाकार मंडळींच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. या टीझरमध्ये शाहिदच्या संपूर्ण शरीरावर टॅटू, डोक्यावर टोपी आणि हातात बंदूक अशा अनोख्या लूकमध्ये तो वावरताना दिसत आहे. दिग्दर्शक विशाल भारद्वाज पुन्हा एकदा काहीतरी वेगळे आणि हटके घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला या चित्रपटाच्या माध्यमातून येत आहे. १ मिनिट ३५ सेकंदाच्या या टीझरमध्ये चित्रपटाचे कथानक काय असू शकते हे समजत नाही. मात्र, चित्रपटातील पात्रांची छोटी झलक पाहायला मिळते. यापूर्वी विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर या दिग्दर्शक-अभिनेता जोडगोळीने “कमिने,” “हैदर,” आणि “रंगून” असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट चित्रपटसृष्टीला दिले आहेत. पुन्हा एकदा ही जोडी ओ रोमिओ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हेही वाचा : टीव्ही अभिनेत्रीने दिली गुडन्यूज; बाळाची पहिली झलक दाखवत व्यक्त केल्या भावना