Shafali Verma : ICC कडून प्रत्येक महिन्यातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष क्रिकेटपटूला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार नोव्हेंबर २०२५ महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूंच्या पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. भारताच्या शफाली वर्माला हा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार देण्यात आला. भारताची युवा फलंदाज शफाली वर्माने नोव्हेंबरमध्ये महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना खेळला होता. या सामन्यातील तिच्या अफलातून कामगिरीसाठी तिला हा नोव्हेंबर २०२५ महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे शफाली वर्माला वर्ल्डकपसाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते. पण सेमीफायनलपूर्वी प्रतिका रावलला दुखापत झाल्याने तिच्या जागेवर शफालीला संधी देण्यात आली होती. यानंतर तिने आपल्या मिळालेल्या संधीचे सोने केले. तिने अंतिम सामन्यात ८७ चेंडूत ८७ धावांची खेळी केली तसेच तिने २ विकेट्स सुद्धा घेतल्या. तिच्या या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने द. आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवला. तिच्या या कामगिरीमुळे तिला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला होता. पुरस्कार भेटल्यावर काय म्हणाली शफाली? नोव्हेंबर २०२५ महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कार जिंकल्यानंतर शफाली म्हणाली, ‘माझ्यासाठी माझ्या पहिल्या महिला क्रिकेट वर्ल्ड कपचा अनुभव माझ्या अपेक्षेनुसार सुरू झाला नव्हता, पण त्याचा शेवट माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त चांगला झाला. मी अंतिम सामन्यात संघाच्या यशात योगदान देऊ शकले आणि घरच्या प्रेक्षकांसमोर पहिला वर्ल्ड कप जिंकण्याचा ऐतिहासिक क्षण अनुभवी शकले, याचा आनंद आहे.’ ‘मला नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद होत आहे. मी हा पुरस्कार माझ्या संघसहकारी, प्रशिक्षक, कुटुंब आणि आत्तापर्यंत माझ्या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांना समर्पित करते. हा पुरस्कार संघाचा आहे.’ सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार दरम्यान, नोव्हेंबर २०२५ महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज सिमॉन हार्मरला देण्यात आला. त्याने नोव्हेंबरमध्ये भारताविरुद्ध कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली होती. त्याने २ कसोटी सामन्यांत मिळून १७ विकेट्स घेतल्या. त्याला मालिकावीर पुरस्कारही मिळाला होता.