पिंपरी | वायसीएम रुग्णालयात महिला डॉक्टराचा लैंगिक छळ?

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात वरिष्ठांकडून आपला लैंगिक छळ होत असल्याची निनावी पोस्ट एका शिकाऊ महिला डॉक्टरने सोशल मीडियावर टाकली. या पोस्टबाबत वायसीएम रुग्णालयात चर्चा सुरू झाली आहे. तक्रारदार महिला डॉक्टर कोण हे जरी माहिती नसले तरी लैंगिक छळ करणार्या डॉक्टराच्या पदाबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
वायसीएम हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरने वांरवार लैंगिक छळ केला. जबरदस्तीने दारू पिण्यास भाग पाडले. सतत या गोष्टी घडत आहेत, अशा आशयाची पोस्ट एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर तीन दिवसांपूर्वी टाकरण्यात आली. दोन दिवसांनंतर या पोस्टचे स्क्रीन शॉट व्हॉट्स ॲपवर व्हायरल करण्यात आले आहेत.
मात्र या पोस्टबाबत खातर जमा झालेली नाही. तसेच ज्या वरिष्ठ डॉक्टर बाबत ही पोस्ट असल्याचे सांगितले जात आहे त्याला देखील कोणताही दुजोरा मिळालेला नाही. विशेष म्हणजे दोन दिवसानंतर ही सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट करण्यात आली आहे.
निनावी तक्रारींची दखल घेण्यात येऊ नये, असा शासनाचा अध्यादेश आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कारवाई होईल का? याबाबत चर्चा सुरू आहे. एकूणच वायसीएम हॉस्पिटलच्या कारभारावर आणि तेथे काम करणाऱ्या डॉक्टरांवर आरोप होत असल्याकारणाने प्रशासनाने या सगळ्याची दखल घेतली आहे.
याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीकडून आठ दिवसांच्या आत अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार असल्याचे समजते. आरोप केलेला डॉक्टर कोण आणि तक्रार करणारी महिला डॉक्टर कोण, याबाबतचा अहवाल सादर होणार आहे.





