कात्रज, दि. 5 (प्रतिनिधी) – रस्त्यावर खासगी किचनमधून थेट रस्त्यावर सांडपाणी व खरकटे पाणी सोडल्यामुळे रस्त्यावर सांडपाण्याचे पाट वाहत असून याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कात्रज चौकातून दत्तनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिराच्या मंदिराजवळ रस्त्याच्या दुसऱ्या दिशेला असलेल्या एका खासगी किचनमधून थेट खरकटे सांडपाणी थेट रस्त्यावर सोडण्यात येत आहे. यामुळे वाहन चालक तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत असून याकडे पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे तसेच आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
हा रस्ता वर्दळीचा असल्याने तसेच या रस्त्याच्या बाजूला दोन या खासगी किचनच्या जवळ मंदिरे असून या ठिकाणी श्रावण महिन्यातील पूजे करीता नागरिक येत असतात. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून या रस्त्यावर खरकटे सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. हे सांडपाणी थांबविण्यात यावे व थेट रस्त्यावर सांडपाणी सोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सांडपाणी अंडरग्राउंड ड्रेनेजमध्ये सोडण्याची व्यवस्था असताना देखील थेट रस्त्यावर सांडपाणी सोडले जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सांडपाणी थेट रस्त्यावर सोडता येत नाही, असे सोडलेले पाणी नागरिकांच्या आरोग्यास घातक आहे. पाणी सोडण्यात येणाऱ्या खासगी संस्थेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच हे सांडपाणी तातडीने बंद करण्याबाबतच्या कडक सूचना करण्यात येतील.
– राजू दुल्लम, ववरिष्ठ आरोग्य निरीक्षक, धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय