satara | खटाव तालुक्याच्या उत्तर भागात भीषण पाणी टंचाई

पुसेगाव, {प्रकाश राजेघाटगे} – खटाव तालुक्याच्या उत्तर भागात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे, काही गावात तर दहा बारा दिवसातून एखादा तास अर्धा तास सार्वजनिक पाणी पुरवठा होत आहे, गेल्या महिन्यापासून कित्येक गावात पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी तसेच इतर स्रोतांची पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे, विहीरी कोरडी पडल्यामुळे पाण्यासाठी गावोगावी महिला, मुलांना व ग्रामस्थांना रोज गावशिवरात रात्रंदिवस भटकंती करावी लागत आहे.
बऱ्याच गावात ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहीरी कोरड्या पडल्याने नळाव्दारे होणारा पाणीपुरवठा बंद पडला असून ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत. काही ठिकाणी गावातील एखाद्या वस्तीवरील हातपंपास थोडेफार पाणी आहे. तेथेच पाणी भरण्यास ग्रामस्थांची झुंबड उडत आहे. सध्या काही हातपंपाची पाणी पातळी खालावल्यामुळे आता पाण्याच्या शोधात शिवारभर भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
उन्हाच्या तीव्रतेने काही विहीरींचीही पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. या भागात विहीरी जेसीबीच्या सहाय्याने खोदल्यामुळे विहिरीला पायऱ्या नाहीत. परिणामी विहीरीतील थोडेफार असलेले पाणी महिला-मुलांना कठड्यावर उभे राहून दोरीच्या सहाय्याने शेंदावे लागत आहे. या भागात असलेले पाझर तलावात जमिनीला पाण्याअभावी भेगा पडल्यामुळे सध्या जनावरांच्या व ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था निर्माण झाली आहे.
एक दोन किलोमीटरहून डोक्यावरून किंवा वाहनातून पाणी आणून जनावरांची तहान भागवत आहेत. ‘टॅकरग्रस्त आपलं गाव’ हा कलंक पुसून गाव पाणीदार बनविण्यासाठी विविध गावांत ग्रामस्थांनी एकजुटीने गेल्या तीन चार वर्षात जलसंधारणाची कोट्यावधीची कामे श्रमदानातून गाव शिवारात केली आहेत.
मात्र यंदा पाऊस न झाल्याने पाण्याची पातळी सर्वच ठिकाणी कमी झाली आहे, आता इलेक्शन झाले नेते मंडळींनी गावोगावच्या पाण्याच्या सोयीसाठी तातडीने टैंकर सुरू करावेत, नेर धरणातील पाणी उपसा बंदी केली. येरळा नदीला पाणी सोडणे बंद झाले,
शेतकऱ्यांची नगदी पिके पाण्याअभावी जाळून खाक होताहेत, पिकांबरोबरच गावोगावच्या माणसांनाही पाण्यावाचून जाळू नये किमान खटाव उत्तर भागातील नागरिकांना व त्यांच्या जनावरांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी, तालुका प्रशासन यांनी तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
ग्रामस्थांसह जनावरांना पाण्याचे दुर्भिक्ष
खटाव उत्तर भागात विविध गावात पाणी पुरवठा करणाऱ्या कित्येक विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांना पाण्यासाठी कोणताही पर्याय उरला नाही. शासनाने तातडीने गावोगावी पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे सोय करणे गरजेचे आहे. वाड्या वस्त्यांसह गावोगावी ग्रामस्थांसह जनावरांना पाण्याचे दुर्भिक्ष.
• उन्हाची दाहकता, पाण्याची टंचाई याभागातील पशुधन धोक्यात.
• लोकप्रतिनिधी, तालुका प्रशासन यांनी तातडीने प्रयत्न करण्याची गरज.
• पाण्याचे टँकर सुरू करण्याची गावोगावी मागणी





