Assam Coal Mine Water Flood: आसामच्या एका कोळशाच्या खाणीत पाणी भरल्याने 9 कामगार अडकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आसामच्या दीमा हसाओ जिल्ह्यातील उमरंगसोजवळील कोळसा खाणीत घडली. खाणीत अचानक पाणी कशामुळे भरले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोळशाच्या खाणीत पाणी भरल्याने कामगार खालीच अडकले आहेत. या घटनेची माहिती मिळताच त्वरित बचावकार्याला सुरूवात करण्यात आली आहे. अडकलेल्या कामगारांना काढण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. या कोळसा खाणीत नक्की किती कामगार अडकले आहेत, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवर (ट्विट) पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, उमरांगसोमधून चिंताजनक माहिती समोर येत आहे. येथील कोळसा खाणीत कामगार अडकले आहेत. कामगारांची अचूक संख्या व स्थितीबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि माझे सहकारी कौशिक राय घटनास्थळी पोहोचत आहेत. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी बचावकार्यासाठी सैन्याची देखील मदत मागितली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) जवान देखील बचावकार्यात मदत करत आहेत.