सांगली(प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मणदूर, ता. शिराळा येथील वृद्धाचा काल (दि. 6) तर औंढी, ता. जत येथील एकाचा रविवारी करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सात झाली आहे. आणखी चार रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यात रविवारी सायंकाळपर्यंत नवे 19 रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या 167 झाली आहे. त्यातील 68 जणांवर मिरजेच्या करोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. औंढी, ता. जत येथील 55 वर्षांच्या पुरुषाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मणदूर, ता. शिराळा येथील 80 वर्षांच्या वृद्धाला करोनाची लागण झाली होती. त्याला शुक्रवारी (दि. 5) अत्यवस्थ वाटू लागल्याने करोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा काल (दि. 6) रात्री उशिरा मृत्यू झाला. त्याचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. रविवारी नव्याने करोनाबाधित झालेल्या रुग्णांमध्ये मणदूर येथील आठ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. सोनवडे, ता. शिराळा येथील 28 वर्षांचा युवक, पेड, ता. तासगाव येथील 35 वर्षांचा युवक व वायफळे येथील 52 वर्षांचा पुरुष, कदमवाडी, ता. कवठेमहांकाळ येथील 38 वर्षांची महिला, विटा (हनुमंतनगर) येथील 34 वर्षांचा युवक, कोरेनगर (इस्लामपूर) येथील 33 वर्षांची महिला, अशा एकूण 19 जणांना करोनाची लागण झाली आहे. ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 123, शहरी भागातील 33 तर महापालिका क्षेत्रातील बाधितांची संख्या 11 आहे. दरम्यान, चांदोली वसाहत, ता. वाळवा येथील 22 वर्षांचा युवक, करंजे, ता. खानापूर येथील 30 वर्षांचा युवक, आंबेगाव, ता. कडेगाव येथील 12 वर्षांची मुलगी व 9 वर्षांचा मुलगा आणि मणदूर, ता. शिराळा येथील 21 वर्षांचा युवक, असे जिल्ह्यातील पाच जण रविवारी करोनामुक्त झाले आहेत.