पालिका शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू

पिंपरी – शासनाने आदेश दिल्यानंतरही पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील शिक्षक सातव्या वेतन आयोगाच्या लाभापासून वंचित होते. मात्र, आता महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यासंदर्भात आदेश काढला असून मनपा प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षकांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासनाने 2 ऑगस्ट 2019 रोजी स्वतंत्र निर्णय दिला होता. प्रशासकीय उदासीनतेमुळे महापालिका शाळेतील शिक्षकांचा हा प्रश्न प्रलंबित राहिला. अनेकदा प्रशासनाच्या विरोधात लढा उभा केला. तरी त्याला दाद मिळालेली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे अध्यक्ष मनोज मराठे यांनी शिक्षकांच्या सहमतीने महापालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, या मोर्चाच्या अगोदरच आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी पुढाकार घेऊन शिक्षकांना मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत बैठक घेत त्यामध्ये शिक्षकांचा हा मुद्दा कायमस्वरुपी मार्गी लावला.
या बैठकीनंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शनिवार दि. 1 फेब्रुवारी रोजी शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश शिक्षण प्रशासन विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे यांना दिले आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.





