मुंबई : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी विस्तृत सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून १७ हजारहून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, वांद्रे बँडस्टँड, जुहू आणि वर्सोवा समुद्रकिनाऱ्यांसह शहरातील प्रमुख ठिकाणी मोठी गर्दी अपेक्षित आहे. विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मॉल्समधील सेलिब्रेशन गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी, प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी केली जाईल. रस्त्यांवरील गस्त वाढवली जाईल. मुंबई पोलिसांनी वाहतूक विभागासह, १० अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३८ पोलीस उपायुक्त, ६१ सहायक पोलीस आयुक्त, २,७९० पोलीस अधिकारी आणि १४,२०० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली एक मोठी सुरक्षा फौज तैनात केली आहे. तसेच, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, शीघ्र प्रतिसाद पथके, बॉम्ब शोधक आणि नाशक पथके, होमगार्ड आणि इतर दले संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. छेडछाड, अवैध दारू आणि अंमली पदार्थांची विक्री यासह इतर गैरकृत्यांमध्ये सामील असलेल्यांवर पोलीस कठोर कारवाई करतील. पोलिसांनी लोकांना सर्व नियमांचे पालन करून शांततेच्या मार्गाने नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आणि सेलिब्रेशनचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.