nagar | खुनी हल्ला केल्याप्रकरणी सात वर्षाची शिक्षा

नगर, (प्रतिनिधी) – गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीला साथ दिल्याच्या कारणावरून दोघांवर प्राणघातक हल्ला करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा आरोपीला नेवासा सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
निवृत्ती भाऊसाहेब कजबे, सखाराम भाउसाहेब कजबे (दोघे रा. धनगरवाडी, ता. नेवासा) व राहुल नवनाथ पाटोळे (रा. ब्राह्मणी, ता. राहुरी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींचे नावे आहेत. आरोपींनी विठ्ठल डोईफोडे व त्यांच्या भावास कुऱ्हाड, लोखंडी पाइपच्या साहाय्याने जबर मारहाण केली होती. २२ मे २०१५ रोजी पोक्सोच्या गुन्ह्यातील मूळ फिर्यादीस आरोपीविरुद्ध मदत केल्याच्या रागातून हा हल्ला झाला होता.
या घटनेनंतर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. जी. जोशी यांनी नेवासा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने साक्षीपुरावे ग्राह्य धरून आरोपीस शिक्षा ठोठावली.
७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड असे शिक्षेचे स्वरूप आहे. खटल्यात सरकारी वकील चंद्रकांत सपकाळ यांना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मयूरेश नवले, व्ही. के. भोर्ड यांनी सहकार्य केले. त्यांना पैरवी अधिकारी ए.एस.आय. नरेश चव्हाण, हेड कॉन्स्टेबल सुभाष हजारे यांचे सहकार्य लाभले.





