पुणे जिल्हा | सात गावे अजून तहानलेलीच

शिक्रापूर, {शेरखान शेख} – शिरुर तालुक्यातील केंदूरसह पाबळ, धामारी, कान्हूर मेसाई, खैरेवाडी, हिवरे, खैरेनगर या सात गावांतील तब्बल २७ हजार ४७३ लोकांची तर ६ हजार ७५४ जनावरांची तहान भागविण्यासाठी दररोज २० टँकरद्वारे ७० खेपा करून पाणीपुरवठा केला जात आहे.
तळेगाव ढमढेरे व मोराची चिंचोली गावांत टँकरची मागणी होत आहे. दरम्यान, टँकर मागणीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले असल्याची माहिती शिरूरचे गट विकास अधिकारी महेश डोके यांनी दिली आहे.
शिरुर तालुक्यातील सात गावांमध्ये शासनाच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा केला जात असताना टँकर अपुरे पडत आहेत. टँकरच्या खेपा वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मात्र, पुढील काही दिवस उन्हाची तीव्रता वाढल्यास व पावसाने ओढ दिल्यास टँकरच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या वाढत्या उन्हाच्या तडाख्याने पाणीपातळी खालावली असल्याने अनेक ठिकाणच्या विहीरी व विंधनविहिरी तसेच पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागले आहेत.
पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भीषण झाला आहे. टँकर व चारा छावणी सुरू करण्याची मागणी वाढू लागली आहे. जून महिना सुरू झाला असल्याने नागरिकांना पावसाचे वेध लागले असून अपुऱ्या पाण्यामुळे दैनंदिन जीवनातील पाण्याचे गणित विस्कळीत झाले आहे.
मोजके पाणी पिण्यासाठी, जनावरांसाठी व घरकामात वापरासाठी वापरताना महिलांना कसरत करावी लागत आहे. पाण्याअभावी पिके जळून चालली आहे. त्यामुळे शेतकरी देखील पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.
चारा टंचाईमुळे दूध व्यवसाय अडचणीत
शिरुर तालुक्यात शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. मात्र, पशुखाद्याच्या वाढलेल्या दरामुळे व दुधाला मिळत असलेल्या कमी भावामुळे पशुपालक शेतकरी अडचणीत आला आहे. आता दुष्काळामुळे चाराटंचाई भासू लागल्याने शेतकऱ्यांना पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे दूध व्यवसाय अडचणीत आले आहे.
टँकर मागणीचे प्रस्ताव वरिष्ठांकडे
शिरूर तालुक्यात सध्या सात गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. चिंचोली मोराची व तळेगाव ढमढेरे गावांचे टँकर मागणी प्रस्ताव प्राप्त झाले असल्याने ते मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाला पाठवले आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल असे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी सांगितले.
टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेली गावे
गाव – बाधित लोकसंख्या – टँकर (खेपा)- पाबळ – ९०८० – ६ (२६), केंदूर – ३९०७– ४ (१२), धामारी- ३९०७ – १ (४), कान्हूर मेसाई – ५९३५ – २ (६), खैरेनगर – १२६१ – १ (२), हिवरे कुंभार – २१२३ – १ (३), खैरेवाडी – १२६० – १ (२), पाबळ (जनावरांसाठी) – ६७५४ – ४ (१५).





