‘उमंग’ ऍपवर मिळणार सात-बारा

पुणे – महसूल विभागाने संगणकीकृत केलेला आणि महाभूमी संकेतस्थळाद्वारे सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असणारा डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात-बारा आता केंद्र शासनाच्या “उमंग’ या मोबाइल ऍपवर उपलब्ध होणार आहे. राज्यातील 358 तालुक्यांतील 44 हजार 560 महसुली गावांतील 2 कोटी 57 लाख सात-बारा उतारे संगणकीकृत करण्यात आले असून, त्यापैकी 99 टक्क्यांपेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरित सात-बारा उतारा “महाभूमी’ संकेतस्थळासह आता “उमंग’वरही मिळणार आहे.
सध्या राज्यातील दररोज दीड ते दोन लाख नागरिक या डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात-बारा उतारा, खाते उतारे आणि मिळकत पत्रिकांचा (प्रॉपर्टी कार्ड) त्यांच्या कार्यालयीन, न्यायालयीन कामकाजासाठी वापर करत आहेत. आतापर्यंत “महाभूमी’ संकेतस्थळावरून साडेपाच कोटी डिजिटल स्वाक्षरित हे अभिलेख डाउनलोड करण्यात आले आहेत. त्यापोटी 105 कोटी रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे. “महाभूमी’ संकेतस्थळावर सध्या 22 लाख नोंदणीकृत वापरकर्ते या सेवांचा लाभ घेत आहेत. यापूर्वी नागरिकांना डिजिटल स्वाक्षरित सातबारा उताऱ्याची प्रत मिळविण्यासाठी महा-ई-सेवा केंद्राचा आधार घ्यावा लागत होता. आता फक्त उमंग मोबाइल ऍप डाऊनलोड केल्यानंतर एका क्लिकवर हे उतारे मिळू शकणार आहेत. उमंग हे ऍप गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
उमंग ऍपवर सात-बारा उताऱ्यांची उपलब्धता अत्यंत सोपी आणि सहज होईल. परिणामी, डिजिटल सातबारा उतारा आणि महाभूमी प्रकल्प महसूल विभागाची डिजिटल क्रांती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
– रामदास जगताप,उपजिल्हाधिकारी





