पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील करोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बुधवारी आणखी सात पोलीस अधिकारी अणि कर्मचारी करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे आतापर्यंत करोना बाधित झालेल्या पोलिसांची एकूण संख्या 24 एवढी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखा व एका पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा अहवाल करोनाचा पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील सर्व पोलिसांची चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सहा पोलिसांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अन्य एका पोलीस ठाण्यातील एका पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशा सात पोलिसांचा अहवाल एकाच दिवशी बाधित आला आहे. सध्या रुग्णालयात 8 पोलीस उपचार घेत आहेत. तर 18 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज दिलेल्या पोलिसांपैकी 11 जण संपूर्ण उपचारानंतर कर्तव्यावर पुन्हा रुजू देखील झाले आहेत. आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या पोलिसांमध्ये तीन अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.