सातारा । १४ कोटींच्या फसवणूकप्रकरणी कश्मिरा पवारसह सात अटकेत

सातारा – पुणे येथील महिलेस टेंडर मिळवून देते, असे सांगून सुमारे 14 कोटींच्या फसवणूक प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी कश्मिरा पवार हिच्यासह अन्य सात जणांना अटक केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाची सल्लागार म्हणून मिरवणाऱ्या कश्मिराने साताऱ्यासह पुणे, सातारा आदी ठिकाणी नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच तिला अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर जामीनावर सुटली होती. पुणे येथील सुषमा खामकर नावाच्या महिलेस महाराष्ट्रातील शाळांना गणवेशाचे टेंडर मिळवून देते असे सांगून तिच्याकडून सुमारे 14 कोटी रुपये तिने घेतले.
मात्र, प्रत्यक्षात कोणतेही टेंडर न देता तिची आर्थिक फसवणूक केली. या महिलेची अनिल वायदंडे याच्या माध्यमातून कश्मिरासोबत ओळख झाली होती. अनिल वायदंडे मृत असून याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कश्मिरा संदीप पवार, गणेश हरिभाऊ गायकवाड, युवराज झळके, राधा युवराज झळके, अनिता जाधव, दशरथ जाधव, अमित भरत वायदंडे या सात लोकांना अटक करण्यात आली आहे. हा गुन्हा नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२२ या दरम्यान घडला आहे.
गुन्ह्यात फसवणुकीची रक्कम १४ कोटी ७३ लाख ४० हजार ४८५ रुपये इतकी आहे. कश्मिरा हिने पाच कोटी रुपयांची बनावट टेंडर प्रत खामकर यांना दिल्याने त्यांना विश्वास झाला होता. मात्र, प्रत्यक्षात असे कोणतेही टेंडर नसल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. फसवणुकीमुळे तक्रारदाराचे कुटुंबीय अस्वस्थ झाल्याने त्यांच्यात वाद झाल्यामुळे फिर्याद देण्यास विलंब झाला. पवार हिला न्यायालयासमोर उभे केले असता तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संदीप म्हेत्रे तपास करीत आहेत.





