145 जागांसाठी साडेसात हजार युवक मैदानात

सातारा -राज्य सरकारने गेल्या काही दिवसांआधी राज्यात पोलीस भरतीची घोषणा करून जिल्हानिहाय पोलीस प्रमुखांनी तशा स्थानिक माध्यमांतून भरतीच्या जाहिराती दिल्या होत्या. मात्र,शासनाने अचानक बदललेल्या निर्णयामुळे भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर 145 जागांसाठी जाहीर झालेल्या भरतीत सातारा जिल्ह्यातील साडेसात हजार तरूण मैदानात उतरले आहेत. गेले अनेक वर्षे रखडलेली भरती अन् त्यात उपलब्ध जागा आणि आलेल्या अर्जाची आकडेवारी पाहता ही भरती टफ जाण्याची भिती तरूणांच्यात आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली होती. त्यासाठी मागवण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. मात्र, सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरातून सुमारे 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज आलेले आहेत.
सातारा जिल्ह्यातही केवळ 145 जागा असून त्यासाठी साडेसात हजार अर्ज आले असून आजपासून पोलीस परेड ग्राऊंडवर शारीरिक आणि मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे.
इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ही भरती पार पाडण्यासाठी पोलीस दलाने कंबर कसली असून मैदानावर व मैदानाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मैदानी चाचणीच्या पूर्वसंध्येला पोलीस परेड ग्राऊंडवर जावून मैदानावरील तयारीचा व पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला. त्यानंतर समीर शेख यांनी अधिकाऱ्यांनी नियोजनाबाबत तसेच मैदानावरील सुविधांचा उपयोग करण्याच्या सुचना केल्या आहेत.
“महाआयटी’च्या निर्देशानुसारच मैदानी चाचणी
दि. 4 ते 8 जानेवारी या कालखंडात चालणाऱ्या मैदानी चाचणीची सरूवात पहाटे 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे. अर्ज केलेल्या उमेद्वारांना “महाआयटी’च्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्रे डाउनलोड करून घ्यावी लागणार असून “महाआयटी’ने दिलेल्या वेळेनुसारच उमेद्वारांनी मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.





