Alephata Bus Stand : आळेफाटा बसस्थानकात मांडली चूल
Alephata Bus Stand : पुणे-नाशिक तसेच कल्याण-अहिल्यानगर हे दोन महत्त्वाचे महामार्ग आळेफाट्याला जोडले जात असल्याने बसस्थानकात दिवसभर मोठ्या संख्येने बसेसची ये-जा सुरू असते. त्यातच अतिक्रमणामुळे गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

बेल्हे : आळेफाटा बसस्थानक परिसरातील वाढत्या अतिक्रमणाने प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले असतानाच आता बसस्थानकाच्या आवारात चक्क चूल मांडून भुईमुगाच्या शेंगा भाजण्याचा प्रकार सुरू असल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या चुलीत परिसरातील प्लॅस्टिक व कचरा जाळला जात असल्याने धुरामुळे प्रवाशांसह स्थानिक व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अतिक्रमणावर दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन देऊन पाच दिवस उलटले तरी प्रत्यक्ष कारवाई झालेली नसल्याने महामंडळ प्रशासन नेमके कोणाची वाट पाहत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आळेफाटा बसस्थानक परिसरातील रस्ते, पदपथ आणि मोकळ्या जागांवर विविध दुकाने, हातगाड्या, प्रवासी वाहने तसेच अनधिकृत व्यावसायिक उपक्रम वाढले आहेत. त्यामुळे बसस्थानक परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. बसस्थानकात येणार्या बसेसना वळण घेताना तसेच प्रवाशांना बसमध्ये चढताना-उतरताना अतिक्रमणाचा अडथळा निर्माण होत आहे. पुणे-नाशिक तसेच कल्याण-अहिल्यानगर हे दोन महत्त्वाचे महामार्ग आळेफाट्याला जोडले जात असल्याने बसस्थानकात दिवसभर मोठ्या संख्येने बसेसची ये-जा सुरू असते. त्यातच अतिक्रमणामुळे गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अतिक्रमणाच्या समस्येवर दोन दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे नारायणगाव आगाराचे व्यवस्थापक वसंत आरगडे यांनी आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनाला पाच दिवस उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रवासी आणि स्थानिक व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे. बसस्थानकातील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असताना महामंडळ प्रशासन बघ्याची भूमिका का घेत आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
एका महिलेने बसस्थानकात चूल मांडली असून त्यावर भुईमुगाच्या शेंगा भाजून प्रवाशांना विकल्या जातात. या चुलीत परिसरातील प्लास्टिक व कचरा टाकून शेंगा भाजल्या जात असल्याने प्लास्टिकचा धूर सर्वत्र पसरतो. त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक व्यावसायिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
-के. पी. सिंग, स्थानिक दुकानदारआळेफाटा बसस्थानकातील अतिक्रमणाबाबत मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. बसस्थानकाला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत अधिकारी पाहणीसाठी येणार असून, बसस्थानकाची हद्द निश्चित करण्यात येणार आहे.
-नवनाथ वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते, आळेफाटा




