पुणे – महाविद्यालये व विद्यापीठात सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या.
करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली सेट आता दि. 27 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.
पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांसाठी सेट परीक्षा घेतली जाते. यंदाची सेट परीक्षा दि. 28 जूनला घेण्यात येणार होती. मात्र, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, परीक्षा कधी होणार याबाबत काहीच माहिती देण्यात आली नव्हती.
त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. सेट परीक्षेची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी दिली.