Service Road – पुणे-बंगळुरू महामार्गावरील ताथवडे ते पुनावळे दरम्यानच्या सेवा रस्त्यावर सुरू असलेल्या कॉंक्रिटीकरणाच्या कामावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम करण्यात आले असताना आता पुन्हा कॉंक्रिटीकरणासाठी रस्ता खोदण्यात आल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गरज नसताना कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. सध्या सेवा रस्त्याच्या एका बाजूचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. हा सेवा रस्ता आधीपासूनच अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यातच पुणे-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या या परिसरात अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे सुरू असलेल्या कामामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. त्या वेळी रस्ता चांगल्या स्थितीत असताना आता पुन्हा त्याच रस्त्यावर नव्याने कॉंक्रिटीकरण करण्यात येत असल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत. कामामुळे सेवा रस्त्यावरील एक लेन बंद असल्याने सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी अधिक गंभीर होत आहे. अनेक वाहनचालकांना लांब काळ ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागत असून स्थानिक रहिवाशांनाही रोजच्या प्रवासात अडथळे निर्माण होत आहेत. परिसरात धुळीचे सावट दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. या कारवाईदरम्यान रस्त्यालगतचा मोठा परिसर मोकळा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर योग्य नियोजन न झाल्याने सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे सावट निर्माण झाले आहे. रस्त्याच्या कडेला माती आणि मुरूम उघडे पडल्याने वाहनांच्या हालचालीदरम्यान धुळीचे लोट उडताना दिसत आहेत.