‘ऍन्टी करप्शन’च्या अहवालाची गंभीर दखल

सहायक शिक्षण संचालक प्रवीण अहिरे यांच्याकडील कामकाज काढले
पुणे – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या अहवालाची शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेतली असून विभागीय सहायक शिक्षण संचालक प्रवीण अहिरे यांच्याकडील कामकाज तत्काळ काढून घेण्यात आले आहे. हा कार्यभार शिक्षण उपनिरीक्षक धनाजी बुट्टे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
सोलापूरमधील कोंडी येथील एका महाविद्यालयात अतिरिक्त विषय मंजुरीसाठी या कार्यालयाचा शिपाई राजू खांदवे याला 26 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या शिपायाने संबंधित प्रकरणात दोन बड्या अधिकाऱ्यांची नावे घेतल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे.
या घटनेमुळे शिक्षण विभागाला मोठा कंलक लागला आहे. एसीबीच्या पथकाने या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू ठेवला आहे. त्यांच्या प्राथमिक अहवालानुसार, शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. यानंतर पोलीस उपअधीक्षकांनी 20 जानेवारी रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे महत्त्वाचा अहवाल सादर केला आहे. त्याची शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी या अहवालानुसार प्रभारी शिक्षण सहसंचालक व्ही. के. खांडके यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या.
“अहिरे यांना कोणतीही कागदपत्रे देऊ नयेत. गुुन्ह्याच्या तपासावर परिणाम होईल, असा निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे ठेऊ नये. त्यांचे कामकाज काढून घेत ते सक्षम अधिकाऱ्याकडे सोपवावे,’ असे शिक्षण सहसंचालकांनी पत्रात म्हटले आहे. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे, त्याबाबतचे आदेशही पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक यांनी जारी केले आहेत. दरम्यान, या प्रकरणाने शिक्षण क्षेत्र ढवळून निघाले आहे.
अहवालात म्हटले आहे…
गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी आवश्यक आहे. तक्रारदाराच्या प्रकरणाशी संबंधित अहिरे हे कागदपत्रांत फेरफार करण्याची अथवा कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो, असा अहवाल एसीबीने सादर केलेला आहे. त्यानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक यांना कारवाईबाबतचे पत्र शिक्षण सहसंचालकांनी पाठवले होते.





