नवी दिल्ली – महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची गंभीर दखल केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घेतली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना त्यांच्यावरील आरोपांबाबत येत्या 72 तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेशही मंत्रालयाने दिले आहेत.
सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केले. त्यांचे महिला खेळाडूंशी असलेले वर्तनही अत्यंत असभ्य आहे. ते सतत महिला खेळाडूंनाच लक्ष्य करत त्रासही देतात. त्यांनी महिला खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षक दिले नाहीत तसेच मोठ्या स्पर्धांच्या कालावधीतही आमच्या संघासाठी फिजीओ किंवा प्रशिक्षक नसतो, असे आरोप महिला कुस्तीपटू विनेश फोगटसह ऑलिम्पिक व राष्ट्रकुल स्पर्धा पदक विजेत्या अनेक महिला कुस्तीपटूंनी सिंह यांच्यावर केले आहेत.
तसेच सिंह यांना हटवत नवी कार्यकारिणी महासंघावर यावी व सिंह यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी या कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे. त्याची गंभीर दखल घेत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सिंह यांना येत्या 72 तासांत यावर स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान, लखनौत होणारे महिला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबिरही रद्द करण्यात आले आहे. या शिबिरात 41 कुस्तीपटू व 13 प्रशिक्षक सहभागी होणार होते. मात्र, आता या आरोपांबाबत स्पष्टता होईपर्यंत हे शिबिर रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) दिली आहे.